Monday, December 28, 2015



बानू असावी 


एक  तरी बानू असावी , मनाच्या कोपऱ्यात जावून बसावी ॥ धृ ॥ 
ना बंध नात्यांचे ,
ना ओझे अपेक्षांचे ,
बेधुंद रंग जीवनाचे, मन मोहिनी  असावी ॥ १ ॥ 

सदा हास्य वदन अन ,
डोळ्यांत  भीती आदराची ,
भेटीत आस मिलनाची , फक्त प्रेरणा असावी  || २ ॥ 

मन मोकळे तरीपन ,
आधार वेल व्हावी ,
बहरेल वृक्ष संगतीने ,ती  संजीवनी प्रभावी ॥ ३ ॥ 

वाणीत माधुर्य जपते ,
वेदना भस्म होती ,
हळुवार पाकळी सुगंधि  , फुंकर ती असावी  ॥ ४ ॥ 

सुख धर्म धेय्य अंगी ,
स्वछंद ती स्वभावी ,
सर्वस्व समर्पित असुनी , केवळ भक्त ती असावी ॥ ५ ॥ 

                                                                        ...... सुमतिनंदन 


Wednesday, August 12, 2015

माधव मन

माधव मन

माधव मन भावन, झाले तन पावन ,
मुकुन्द मुरारी , कशी वाजविली बासुरी  ॥ धृ ॥


सप्त द्धार तन बासुरी ,
जीवन रस वाहे अंतरी,
नाद ब्रह्म चिरकाल निनादे तव, मुख कमला वरी ॥ १ ॥  अशी वाजवली बासुरी ……


सप्त स्वर अधर धरी ,
अंगुली फिरउनी पाहे हरी,
पर ब्रह्म सनातन निघते धून , धुंद जगाला करी  ॥ २ ॥ अशी वाजवली बासुरी ……


सप्त रिपु नडली भारी ,
अंतरात्मा आक्रोश करी,
 कृष्ण रंग मोहरीत  निघते तन, मोक्ष पाहे अंतरी ।।३।। अशी वाजवली बासुरी ……


मधूर स्वर मोहन बासुरी ,
चैतन्य प्रभू फुंकर मारी ,
जीवन मुक्तीचा अनुभव आता, रास क्रीडा करी ।।४।।अशी वाजवली बासुरी ……

……………………………… ……………………… सुमतिनंदन